खेड : तालुक्यातील संगलट ओवली स्टॉप येथून चारचाकी/दुचाकी गाडी घेऊन गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संबंधित तरुणाचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संगलट मोहल्ला (ता. खेड) येथील रहिवासी हमीम कलाम नाडकर (वय २४) हे १ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संगलट ओवली थांब्याजवळून स्वतःचे वाहन घेऊन बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र नातेवाईक व परिचित ठिकाणी शोध घेतला असता त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. तीन दिवस उलटूनही हमीम यांच्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
याप्रकरणी तरुणाची पत्नी फिरदोस हमीम नाडकर (वय २४) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे संगलट परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




