ग्रीन नेस्ट रिसॉर्ट मध्ये विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
लांजा (अरबाज नेवरेकर) : कृषी विद्यालय लांजा येथील १९८४-८६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रीन नेस्ट रिसॉर्ट व सानिया स्विमिंग पूल , लांजा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तब्बल ४० वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आल्याने स्नेहसंमेलनाला जुन्या आठवणी, मैत्री आणि आपुलकीचा अनोखा रंग लाभला.
स्नेहसंमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. बॅचमधील दिवंगत मित्रांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वतःची तसेच कुटुंबाची माहिती देत सध्याच्या जीवनप्रवासाबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. तब्बल चार दशकांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. जुन्या आठवणींमधून अनेक आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवता आले.
दुपारच्या सत्रात कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांनी या खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. आनंद कुंभार यांनी सादर केलेल्या दशावतारातील ‘राजा’ या कलाविष्काराला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
३ ऑक्टोबर रोजी सर्व माजी विद्यार्थ्यांनी कृषी विद्यालय लांजा येथे प्रत्यक्ष भेट दिली. विद्यालयाच्या परिसरात पाऊल ठेवताच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शालेय जीवनातील आठवणी, वर्गमित्रांसोबतचे प्रसंग आणि विद्यालयातील अनुभव यांची यावेळी आठवण काढण्यात आली. या भेटीमुळे अनेक माजी विद्यार्थी जुन्या आठवणींत रमून गेले.
या स्नेहसंमेलनामुळे १९८४-८६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांमधील स्नेह व मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले. चार दशकांनंतर झालेल्या या भेटीने प्रत्येकाच्या मनात आनंददायी आठवणी निर्माण केल्या. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी लांजा तालुक्यासह विविध ठिकाणी असलेल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.





