चिपळूण (प्रतिनिधी) : वहाळ जिल्हा परिषद गटातील निवळी येथील अनेक वर्षांपासून दुरवस्थेत सापडलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न अखेर मार्गी लागणार असून लवकरच या ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी नवी सुसज्ज इमारत आकारास येणार आहे. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी प्रत्यक्ष निवळी येथे भेट देऊन दवाखान्याच्या सद्यस्थितीची सविस्तर पाहणी केली. सध्याच्या अत्यंत जीर्ण झालेल्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली असून, ती पूर्ण होताच नव्या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांच्या दृष्टीने हा दवाखाना अत्यंत महत्त्वाचा असल्याने आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून कामाला प्रशासकीय गती दिली जाणार आहे.
वहाळ जिल्हा परिषद गटातील जनतेने नवनिर्वाचित सदस्य शिवानी संदीप सावंत यांच्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाला विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी सभापती नाटेकर यांनी दिली. दवाखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सावंत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा मोलाचा ठरत असल्याचे नमूद करत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून हे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. नवीन अत्याधुनिक वास्तू उभी राहिल्यामुळे निवळीसह लगतच्या परिसरातील पशुधनावर स्थानिक पातळीवरच तत्पर आणि सक्षम उपचार उपलब्ध होतील, ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी संदीप सावंत, सहायक आयुक्त सोनावणे, नाना सुर्वे, भरत बल्लाळ, विजय भुवड, महेश डिके, संजय ऊर्फ बावा भागडे, संदीप भागडे, सुरेश कांबळे, प्रशांत सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी-ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







