पुणे: राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील तिसरी निवड यादी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या तिसऱ्या फेरीत एमबीबीएस आणि बीडीएस या दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण ११ हजार ४३१ उपलब्ध जागांपैकी तब्बल ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून केवळ ९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. तिसऱ्या फेरीत महाविद्यालयांचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी येत्या बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या सविस्तर आकडेवारीनुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ७० महाविद्यालयांमधील एकूण ८ हजार ८१४ जागांसाठी राबवण्यात आलेल्या फेरीत ८ हजार ८११ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून अवघ्या ३ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये राज्यातील ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्वच्या सर्व ५ हजार ६५ जागा तसेच २५ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ३ हजार २९९ जागा पूर्ण क्षमतेने भरल्या गेल्या आहेत, तर दोन खासगी वैद्यकीय विद्यापीठांमधील ४५० पैकी ४४७ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. दुसरीकडे, बीडीएस अभ्यासक्रमाच्या २९ महाविद्यालयांतील २ हजार ६१७ उपलब्ध जागांवर २ हजार ५२९ विद्यार्थ्यांना संधी मिळाली असून ८८ जागा रिक्त राहिल्या आहेत. यात ५ शासकीय दंत महाविद्यालयांतील सर्व ३१७ जागांचे वाटप झाले असून, २३ खासगी महाविद्यालयांतील २ हजार २०० पैकी २ हजार १२० जागांवर विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे तर ८० जागा रिक्त आहेत. एका खासगी दंत विद्यापीठातील १०० जागांपैकी ९२ जागांवर प्रवेश निश्चितीसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत.
प्रवेशाची संधी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह विहित मुदतीत संबंधित महाविद्यालयामध्ये स्वतः हजर राहून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी धनादेशाद्वारे शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली असली तरी पुढील कामकाजाच्या दिवशी धनादेशाऐवजी डिमांड ड्राफ्ट जमा करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द मानण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सीईटी कक्षाने दिला आहे.





