साखरपा / सिकंदर फरास : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे आणि महिला उद्योजकतेला चालना देणे या उद्देशाने भूमी रत्न महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने भडकंबा येथे उभारण्यात येणाऱ्या कुक्कुटपालन प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
महिलांनी केवळ बचत गटांपुरते मर्यादित न राहता उत्पादन, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचा उद्योग उभा करून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत यांनी महिलांच्या उद्योग क्षेत्रातील वाटचालीला पाठिंबा दर्शवला. महिलांनी उद्योग क्षेत्रात घेतलेल्या भरारीला यशस्वी करण्यासाठी आमदार म्हणून आपण पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आश्वासक प्रतिपादन त्यांनी केले. कुक्कुटपालनासारख्या व्यवसायामुळे ग्रामीण भागात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होत असून, योग्य नियोजन आणि बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे या व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होते, असेही त्यांनी नमूद केले.
भूमी रत्न महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून भडकंबा येथे सुरू होणारा हा प्रकल्प महिलांच्या सामूहिक उद्योजकतेला योग्य दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, सभापती शर्वरी वेल्हे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, सागर तांदळे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, पंचायत समिती सदस्य जाधव मॅडम, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर,ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेर्डे, माजी सभापती जयसिंग माने, महिला तालुकाप्रमुख नेत्रा शिंदे, बापू शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग व पदाधिकारी उपस्थित होते.






