गुहागर : तालुक्यातील तळवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषतः तळवली शिगवणवाडीमध्ये बिबट्याने पाळीव कुत्र्यांना भक्ष्य बनवून फस्त केल्याच्या घटना घडल्याने शेतकरी, गुराखी आणि पहाटे तसेच संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि संभाव्य हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पाहणीदरम्यान प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले नसले तरी वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी बाहेर पडताना हातात काठी व बॅटरी बाळगावी, तसेच आवश्यक ती सतर्कता बाळगावी अशा सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.





