सिने-नाट्य अभिनेता भूषण कडू यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत
लांजा (अरबाज नेवरेकर): लांजा शहरातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनातून विरंगुळ्याचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने किरणोदय फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘फ्री स्टाईल दांडिया गरबा रास २०२६’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लांजा नगराध्यक्षा सावली कुरूप व लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर, नगरसेविका निधी गुरव, प्रांजल यादव, श्रद्धा तोडकरी ,माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘कॉमेडी एक्सप्रेस’ फेम प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेता भूषण कडू यांची उपस्थिती होय. त्यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या उत्साहात आणखी भर पडली.
या कार्यक्रम दरम्यान कर्तृत्व मान महिला ,प्रियंवदा जेधे, ॲड.लीना जेधे,अर्चना पेणकर,स्वप्ना सावंत आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी संगीताच्या तालावर दांडिया आणि गरबा नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. आकर्षक वेशभूषा, संगीताचा ठेका आणि महिलांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
महिलांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. किरणोदय फाउंडेशनने महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किरणोदय फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप गुरव, चिंतामणी पोटफोडे, राकेश पोटफोडे, रवी कासार,प्रवीण जेधे ,अंकित लाड, ओंकार कोळेकर, अनिल कांबळे,आकाश म्हापुसकर,दिनेश खेडेकर, बाबू कदम,विनायक कांबळे ,प्रसाद पाटोळे,दिनेश भुर्के,विजय हटकर,अस्लम बागवान आदींनी विशेष मेहनत घेतली. सर्वांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा दांडिया गरबा रास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.







