लांजा / अरबाज नेवरेकर: सन २००५ मधील भीषण अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या नैसर्गिक आपत्तीत सर्वस्व गमावून सुरक्षित स्थानी स्थलांतरित झालेल्या लांजा तालुक्यातील निवसर बागवाडी येथील २८ कुटुंबांतील सुमारे १४० पुनर्वसनग्रस्तांच्या प्रदीर्घ वनवासाला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. स्थलांतरानंतर तब्बल दोन दशके म्हणजेच अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे हाल सोसणाऱ्या या वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांची गंभीर दखल घेऊन राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी सातत्याने केलेल्या प्रभावी पाठपुराव्याला यश आले आहे. या प्रयत्नांना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने या वसाहतीमधील सर्वसमावेशक विकासकामांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यावर सकारात्मक कार्यवाही सुरू झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीनंतर बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले खरे, मात्र त्या ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, पथदीपांचा अभाव, सांडपाण्याच्या निचऱ्याची गैरसोय आणि पिण्याच्या पाण्याची वानवा यामुळे ग्रामस्थांचे जगणे अत्यंत खडतर बनले होते. विशेषतः अंतर्गत रस्ते नसल्यामुळे आजारी व्यक्तींना उपचारासाठी मुख्य रस्त्यापर्यंत नेणे असो की आपत्कालीन स्थितीत वसाहतीपर्यंत रुग्णवाहिका पोहोचवणे, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा न झाल्याने उद्भवणाऱ्या समस्या, संरक्षण भिंतीची गरज, निवारा शेड, कब्रस्तान तसेच वाडीअंतर्गत रस्ते यांसारख्या अत्यंत अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी स्थानिक नागरिक प्रशासनाकडे सातत्याने दाद मागत होते.
सन २००५ पासून या गंभीर समस्यांचा अविरत पाठपुरावा करणारे निवसर गाव समितीचे अध्यक्ष तथा गावाणे पंचायत समिती गणाचे विभागप्रमुख अल्लाफ काझी, उपशाखाप्रमुख अख्तर सागवेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर जनप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेमुळे न्याय मिळाला आहे. आमदार किरण सामंत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्था, कब्रस्तान, निवारा शेड आणि संरक्षण भिंतीसारख्या कामांना मंजुरी मिळून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याने निवसर गाव विकास समितीने सामंत बंधूंप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली असून संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही आभार मानले आहेत. अनेक वर्षांनंतर आपल्या हक्काच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत असल्याने निवसर बागवाडीतील सर्व पुनर्वसनग्रस्त नागरिकांमध्ये सध्या समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





