नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरात वेगाने घडणाऱ्या घडामोडींमुळे देशभरातील हवामानात मोठे फेरबदल होत असून हवामान विभागाने देशातील १० राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याने विविध प्रांतांत वातावरणात कमालीची उलथापालथ नोंदवली जात आहे. दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच पूर्वेकडील ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांसह पद्दुचेरी, अंदमान-निकोबार व लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात तामिळनाडू आणि पद्दुचेरीच्या किनारपट्टीवर ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तरेकडे उत्तर प्रदेशात २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, तर बिहारमध्ये २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही महिन्याच्या अखेरीस हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने नोंदवली आहे.
महाराष्ट्राचा विचार करता पुढील दोन दिवस हवामान मुख्यत्वे कोरडे राहणार असले, तरी २७ ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार २७ तारखेला गडचिरोलीत ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्यासह यलो अलर्ट देण्यात आला असून २८ ऑक्टोबर रोजी या भागात पावसाचा जोर अधिक तीव्र होणार आहे. हवामान विभागाने २८ ऑक्टोबरसाठी गडचिरोली जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे; यावेळी गडचिरोलीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याच दिवशी राज्यातील कोल्हापूर घाट परिसर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट परिसर, जालना, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






