देवरूख: देवरूख-मार्लेश्वर मार्गावर सुरू असलेल्या रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड डंपरच्या वाढत्या वेगावर आता पोलिसांकडून थेट नियंत्रण आणले जाणार आहे. या मार्गावरून सुसाट धावणाऱ्या डंपरमुळे भीषण अपघातांची शक्यता निर्माण होऊ नये आणि पादचाऱ्यांसह अन्य वाहनचालकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक, डंपरमालक आणि चालकांची बोंड्ये येथे तातडीची बैठक बोलावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देत सक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने स्थानिक ग्रामस्थांबरोबरच पर्यटकांच्या वाहनांची येथे दिवसरात्र मोठी वर्दळ असते. सध्या या मार्गाचे रुंदीकरण वेगाने सुरू असल्याने बांधकामाचे साहित्य घेऊन धावणाऱ्या डंपरची संख्या कमालीची वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच याच साहित्याची वाहतूक करणाऱ्या एका डंपरचा निवेखुर्द येथील धोकादायक वळणावर भीषण अपघात घडला होता, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला होता. रस्त्याच्या कामासाठी साहित्याची ने-आण करणे गरजेचे असले तरी सार्वजनिक रस्त्यावरून धावताना नियमांचा फज्जा उडवणे खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.
बोंड्ये येथील बैठकीत पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिले. यामध्ये डंपरचालकांकडे वैध वाहन परवाना असणे, वाहनांची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे, रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज घेऊन वाहने नियंत्रित गतीने चालवणे, चालकाने कोणत्याही परिस्थितीत मद्यपान केलेले नसणे, सर्व डंपरना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवणे, वाहनांचे हेडलाईट व साईड इंडिकेटर सुस्थितीत कार्यरत ठेवणे तसेच ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे तिथे प्रवाशांच्या सतर्कतेसाठी तात्काळ सावधानतेचे फलक लावणे या बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अन्यथा बेदरकार वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.






