संगमेश्वर : शासनाच्या मनरेगा योजनेंतर्गत शेतविहीर मंजूर होऊनही त्याचा अपेक्षित लाभ मिळाला नसल्याचा आरोप करत फुणगूस येथील सुभाष रमेश लांजेकर यांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा १५ दिवसांनंतर फुणगूस बाजारपेठ येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे शेतविहीर योजनेच्या लाभाबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी लांजेकर यांनी डेप्युटी सीईओ सागर पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच या निवेदनाची प्रत संगमेश्वर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडेही देण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
लांजेकर यांनी दिलेल्या निवेदनात शेतविहीर मंजुरीनंतरच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवले आहेत. ग्रामपंचायतीकडून विहीर मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासंदर्भात जागा निश्चित करून खोदकाम करण्यास सांगितले; मात्र आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन वेळेत मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. परिणामी, विहिरीच्या खोदकामासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागले असून, त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत तत्कालीन ग्रामसेवक अशोक भूते आणि रोजगार सेवक रश्मिकांत देसाई यांनी बजावलेल्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी लांजेकर यांनी केली आहे. रोजगार सेवकाच्या नियुक्तीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, संबंधित ग्रामसभांचे ठराव, इतिवृत्त, उपस्थिती नोंदवही, राजीनामा तसेच नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ग्रामसेवक भूते यांच्या कार्यकाळातील संबंधित नोंदी आणि रोजगार सेवक देसाई यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष तपासणी झाल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना मंजूर शेतविहिरीच्या प्रकरणात आपल्याला अडचणींचा सामना का करावा लागला, असा सवाल लांजेकर यांनी उपस्थित केला आहे. ग्रामसभेतील निर्णयानंतरही लाभार्थ्याला योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळत नसेल, तर सामान्य नागरिकाने न्यायासाठी कोणाकडे जावे, अशी भूमिका त्यांनी निवेदनातून मांडली आहे.
निवेदन सादर केल्यापासून १५ दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी सुरू करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी लांजेकर यांनी केली आहे. निर्धारित मुदतीत न्याय न मिळाल्यास फुणगूस बाजारपेठ येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशीबाबत काय निर्णय घेते, तसेच शेतविहीर योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील आरोपांवर काय कार्यवाही होते, याकडे फुणगूस परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





