खेड: विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास कळावा, शिवकालीन गडकिल्ल्यांची रचना आणि शिवरायांचा पराक्रम बालमनावर ठसावा या उदात्त हेतूने बिजघर नं. १ शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून शिवकालीन किल्ल्याची अत्यंत देखणी प्रतिकृती साकारली आहे. शालेय स्तरावर राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शाळेत मोठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आणि इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या या उपक्रमाच्या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते निवृत्त इन्स्पेक्टर विश्वासराव भोसले, निवृत्त कॅप्टन राजाराम भोसले, सातगाव विभागाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र भिकाजीराव भोसले, गावचे मानकरी सुनीलराव भोसले, प्रतिष्ठित नागरिक उमेश राजाराम भोसले, अध्यक्षा आकांक्षा भगवान जंगम, माजी अध्यक्ष भगवान जंगम, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, सुरेखा पवार, संजना मर्चंडे, अनिता खोपकर, सुजाता खोपकर व मनीषा खोपकर आदी ग्रामस्थ व पालकांची प्रमुख उपस्थिती होती.
हा किल्ला हुबेहूब साकारण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शिक्षक संदीप घाणेकर सर, शैलेश पराडकर सर तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि रचना अत्यंत बारकाईने मांडण्यात आल्याने उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक केले. याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते विश्वासराव भोसले यांनी शाळेच्या विविध उपक्रमशीलतेचा गौरव केला. पुस्तकी ज्ञानासोबतच शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमाला आणि गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाला खऱ्या अर्थाने उजाळा दिला असल्याचे सांगत त्यांनी शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात शाळेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.





