स्थानिक समस्या सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणा-जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यातील स्थानिक समस्यांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणाऱ्या उमेदवारांना शासनामार्फत सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जाईल, असे स्पष्ट करत तरुणांनी आपल्या कल्पना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘Seva First Innovation Challenge 2026’ हा उपक्रम येथील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. या जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात जिल्ह्यातील ३९ उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्या.
या सादरीकरण सत्रात कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, संशोधन आणि नाविन्यपूर्ण विकास अशा विविध क्षेत्रांशी निगडित प्रकल्पांचे सखोल परीक्षण करण्यात आले. यासाठी शासकीय व तांत्रिक क्षेत्रातील नऊ तज्ज्ञ परीक्षकांचे मंडळ नियुक्त करण्यात आले होते. यामध्ये महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, कृषी उपसंचालक प्रतीक पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. एम. शिंदे, उद्योग अधिकारी संकेत कदम, पुरवठा निरीक्षक ऋषिकेश जाधव, डीआयटी प्रतिनिधी प्रतीक पेठकर, प्रा. चंद्रशेखर जाधव, फिनोलेक्स कॉलेजचे प्रा. एम. एन. तगारे तसेच शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. श्रीकृष्ण मस्के यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या मूल्यमापनातून सर्वोत्तम ठरणाऱ्या संकल्पनांची निवड करून संबंधित गुणवंत उमेदवारांना शासनातर्फे गौरविण्यात येणार असून त्यांना पुढील विकासासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त दत्ता दि. चव्हाण यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर अकोजवार, आयोजक प्रा. चंद्रशेखर जाधव, विद्यार्थी स्वयंसेवक आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी मो. ए. दुधाळ, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी मनोज लोखंडे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






