श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्टचा संगीतमय उपक्रम; ओंकार प्रभूघाटे आणि संपदा माने यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
चिपळूण : दिवाळीच्या मंगलमय पर्वात भक्ती आणि संगीताचा सुरेल संगम चिपळूणकरांना अनुभवायला मिळाला. श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘स्वर दीपोत्सव’ या दिवाळी पहाट कार्यक्रमात अभंग, भावगीते आणि नाट्यपदांच्या सादरीकरणाने वातावरण संगीतमय झाले.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात मुंबईचे गायक ओंकार प्रभूघाटे आणि संपदा माने यांनी आपल्या सुरेल गायनातून रसिकांची मने जिंकली. भक्तिगीते, भावस्पर्शी भावगीते आणि लोकप्रिय नाट्यपदांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संगीत मैफलीमुळे चिपळूणकरांची दिवाळी खऱ्या अर्थाने स्वरमयी झाली.
या कार्यक्रमाला चैतन्य पटवर्धन यांनी संवादिनी, केदार लिंगायत यांनी तबला, मंगेश चव्हाण यांनी पखवाज, तर अद्वैत मोरे यांनी तालवाद्यांची साथ दिली. पूर्वा पेठे यांनी प्रभावी निवेदन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. भक्तिरस आणि संगीताचा अनुभव देणारा हा ‘स्वर दीपोत्सव’ रसिकांसाठी दिवाळीची अविस्मरणीय पर्वणी ठरला.




