चिपळूण : चिपळूण तालुक्यातील आबिटगाव-बौद्धवाडी येथे कीटकनाशक औषध प्राशन केल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर गणपत पवार (वय ५०, रा. आबिटगाव-बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली असून ७ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर पवार यांना दारूचे व्यसन होते. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन ते आबिटगाव येथील घरी आले. त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या आणि उग्र वास येत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खबर देणाऱ्या प्रियंका राजेश जाधव यांच्या आईने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असताना प्रभाकर पवार यांनी कीटकनाशक औषध प्राशन केल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.५५ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.





