दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांची वाढती गर्दी; धोकादायक भागामुळे अपघाताची भीती
गणपतीपुळे (वैभव पवार) : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरील संरक्षण भिंतीचा काही भाग समुद्राच्या जोरदार लाटांच्या तडाख्याने कोसळला आहे. गेल्या काही वर्षांपासून या भिंतीची पडझड सुरू असून, सध्या तुटलेला भाग पर्यटकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे. विशेषतः दिवाळी पर्यटन हंगामात समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना या धोकादायक भागाकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मेरीटाईम बोर्ड अर्थात बंदर खात्याच्या माध्यमातून पर्यटकांच्या सोयीसाठी पायऱ्यांची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. पर्यटकांना या पायऱ्यांवर बसून अथांग पसरलेल्या निळ्याशार समुद्राचे सौंदर्य न्याहाळता यावे, तसेच सायंकाळच्या वेळी नयनरम्य सूर्यास्ताचा आनंद घेता यावा, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, मागील चार ते पाच वर्षांपासून समुद्राच्या जोरदार लाटांमुळे या संरक्षण भिंतीचा काही भाग हळूहळू कोसळत चालला आहे.
या संरक्षण भिंतीवरील पायऱ्यांचा वापर करून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर उतरणे सोयीचे होते. तसेच शासकीय विश्रामगृह परिसरातून मंदिराकडे जाण्यासाठीही या मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. दिवाळीच्या पर्यटन हंगामात गणपतीपुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, अनेक पर्यटक या संरक्षण भिंतीवरून ये-जा करतात. मंदिराकडून स्मशानभूमी पार्किंगच्या दिशेने जाण्यासाठीही पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. मात्र, भिंतीचा भाग कोसळल्याने या मार्गावरून ये-जा करताना पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः लहान मुले आणि वृद्ध पर्यटकांना तुटलेल्या भागातून मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कोसळलेल्या भिंतीचा काही भाग धोकादायक स्वरूपात दिसत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. गर्दीच्या हंगामात या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मेरीटाईम बोर्ड अर्थात बंदर खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची तातडीने पाहणी करून तुटलेल्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करावी किंवा आवश्यकतेनुसार नव्याने भिंतीचा भाग उभारावा, अशी मागणी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून होत आहे. पर्यटनस्थळाची वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी संबंधित विभागाने वेळीच कार्यवाही करणे आवश्यक आहे.





