रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील हातखंबा तिठा ते हातखंबा गावादरम्यानचा तीव्र उतार वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. विशेषतः उताराच्या परिसरात योग्य ठिकाणी गतिरोधक अथवा अन्य प्रभावी वेगनियंत्रक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हातखंबा तिठ्याकडून हातखंबा गावाच्या दिशेने जाताना वाहनांना तीव्र उताराचा सामना करावा लागतो. या उतारावर अवजड वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग अनियंत्रितपणे वाढण्याची शक्यता असते. वेग कमी करण्यासाठी चालकांना सातत्याने ब्रेकचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत वाहनावरील नियंत्रण सुटणे, ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणे अथवा वाहनात तांत्रिक बिघाड होण्याचा धोका वाढतो.
या मार्गावर यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या असून, त्यात काहींना जीव गमवावा लागला, तर काही जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हा परिसर अपघाताच्या दृष्टीने संवेदनशील बनला आहे. उतार संपल्यानंतर हातखंबा गावाच्या दिशेने चढ सुरू होत असल्याने वाहनचालकांना वेगावर नियंत्रण मिळवताना अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. उतारावर वाढलेला वेग आणि त्यानंतरचा चढ यामुळे या मार्गावरील वाहतुकीची स्थिती अधिकच आव्हानात्मक बनते.
वाहनांचा वेग कमी करण्यासाठी प्रशासनाकडून बॅलर लावण्यात आले असले, तरी त्याचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता या संपूर्ण पट्ट्याची तांत्रिक पाहणी करून अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
महामार्गावर गतिरोधक बसविताना वाहतूक सुरक्षेचे तांत्रिक निकष, रस्त्याची रचना, वाहनांची वर्दळ आणि उताराची तीव्रता यांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने हातखंबा तिठा–हातखंबा गाव मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना निश्चित कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या धोकादायक पट्ट्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हातखंबा तिठा-गाव मार्गावरील धोकादायक उतार ठरतोय अपघातांचा सापळा; गतिरोधकासह सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी
Leave a Comment





