सामाजिक कार्यकर्ते प्रविण जाधव आक्रमक
चिपळूण : चिपळूण तालुक्यात राजरोसपणे सुरू असणाऱ्या अवैध दारूधंद्यांवर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही महिनाभरात कोणतीही पावले न उचलल्याने संतप्त झालेले शिरळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण राजाराम जाधव यांनी येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर थेट आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी २१ सप्टेंबर रोजी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना अधिकृत निवेदन सादर करून प्रशासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभारावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
तालुक्यातील गावठी हातभट्टी दारूचे उत्पादन, बेकायदा दारूधंदे तसेच गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री व वाहतूक पूर्णपणे रोखण्याच्या मागणीसाठी जाधव यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण पुकारले होते. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या समक्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी लेखी पत्र देऊन धडक कारवाईसाठी एका महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, ही मुदत संपूनही संबंधित विभागामार्फत नेमकी काय कारवाई झाली, याचा कोणताही तपशील अथवा माहिती न दिल्याने प्रशासनाने दिलेले आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. दिलेल्या मुदतीत ठोस पावले न उचलल्यास उपोषण सोडताना दिलेल्या इशाऱ्यानुसार आता २ ऑक्टोबर रोजी आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या टोकाच्या पावलामुळे अनुचित प्रकार घडल्यास त्यास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण आणि संबंधित जबाबदार अधिकारीच कारणीभूत राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यापूर्वी १५ ऑगस्ट २०१६ रोजी जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी जाधव यांनी पंचायत समिती चिपळूणसमोर यशस्वी उपोषण केले होते, ज्याची दखल घेऊन शासनाने पोषण आहाराच्या दर्जात सुधारणा केली होती. आता पुन्हा एकदा तालुक्यातील तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि अवैध दारूचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांनी थेट आत्मदहनाचे हत्यार उपसल्यामुळे महसूल, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





