राजापूर (प्रतिनिधी): पुणे ते राजापूर एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची सोन्याचे दागिने व कपडे असलेली बॅग अनावधानाने दुसऱ्या प्रवाशाकडून नेली गेल्याची घटना घडली होती. मात्र, राजापूर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच संबंधित प्रवाशाचा माग काढून सुमारे २ लाख ६२ हजार ५०० रुपयांच्या दागिन्यांसह ती बॅग मूळ मालकिणीकडे सुखरूप सुपूर्द केली. सर्व ऐवज जसाच्या तसा परत मिळाल्याने संबंधित महिलेने आपली फिर्याद मागे घेतली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मूळच्या पासार्डे (कोल्हापूर) येथील रहिवासी व सध्या जैतापूर (राजापूर) येथे वास्तव्यास असणाऱ्या अनुजा प्रशांत कांबळे या २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत राजापूर आगाराच्या पुणे ते राजापूर एसटी बसने (एमएच-१४ बीटी-२२७२) प्रवास करत होत्या. कोल्हापूर ते राजापूर मार्गावरील पाचल येथे बस आल्यानंतर आपल्या सीटवर ठेवलेली दागिन्यांची बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या बॅगेत २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे दोन टॉप्स, ५ ग्रॅमची चेन आणि २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मौल्यवान ऐवज होता. त्यांनी तात्काळ पाचल येथे पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त होताच राजापूर पोलिसांनी आगारात पोहोचलेल्या गाडीची व प्रवाशांची कसून तपासणी सुरू केली. सर्व प्रवासी उतरल्यानंतर बसमध्ये एक बेवारस बॅग पोलिसांना मिळून आली. त्या बॅगेतील कपडे व साहित्याची पडताळणी करताना एका टी-शर्टवर ‘नाऊळ देववाडी तिठवली, वैभववाडी’ असे नाव नमूद असल्याचे आढळले. या महत्त्वाच्या धाग्यावरून राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ संबंधित गावचे पोलिस पाटील हर्याण यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवली.
त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेसह नाऊळ देववाडी तिठवली येथे धाव घेतली. चौकशीअंती संबंधित प्रवासी गर्दीच्या गडबडीत स्वतःची बॅग गाडीतच विसरून चुकून महिलेची बॅग घेऊन उतरल्याचे स्पष्ट झाले. त्या व्यक्तीने कोणतीही छेडछाड न करता ती बॅग पोलिसांसमक्ष संबंधित महिलेकडे सुपूर्द केली. राजापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यातील सर्व दागिने व साहित्य सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. हरवलेला ऐवज तात्काळ मिळाल्यामुळे महिलेने समाधान व्यक्त करत तक्रार मागे घेतली.





