गणपतीपुळे (वैभव पवार) : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कायदा-सुव्यवस्था, सायबर सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेली जनजागृतीची मोहीम आता थेट गावागावांत पोहोचू लागली आहे. जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये नुकताच विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून सायबर जनजागृतीपर प्रबोधन उपक्रम पार पडला. या वेळी जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी उपस्थितांना सायबर गुन्हे आणि विविध सामाजिक विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सहकार्यातून ‘मिशन प्रबोधन’ हा नागरिकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी पोलीस व सामान्य नागरिकांमध्ये थेट सुसंवाद घडवून आणला जात आहे. मालगुंड येथील कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या, स्थानिक पातळीवरील कायदा व सुरक्षेचे प्रश्न समजून घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
इंटरनेटच्या युगात वाढती सायबर फसवणूक, कायदेशीर हक्क व नागरिकांची कर्तव्ये, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा, वाहतुकीचे नियम, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा या सर्व पैलूंवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आपत्कालीन मदतीसाठी डायल ११२, सायबर फसवणुकीच्या तक्रारीसाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकांविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय अंमली पदार्थांविरोधातील ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ व ‘मिशन फिनिक्स’, गुन्हे तपासातील संवादासाठी ‘मिशन प्रगती’, ज्येष्ठांसाठी ‘मिशन जीवन’, नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘मिशन प्रतिसाद’, गतिमान सेवेसाठी ‘मिशन रॅपिड’ आणि वाहतूक सुरक्षेसाठी ‘मिशन टेप सेफ’ अशा विविध उपक्रमांची ओळख ग्रामस्थांना करून देण्यात आली. ही जनजागृती तळागाळापर्यंत नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल माध्यमे, माहितीपट, ॲनिमेशन आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमाला रत्नागिरी पंचायत समितीच्या सदस्या पूर्वा दुर्गवळी, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामसेवक प्रक्षाळे, लिपिक मिलिंद खेऊर, ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये, शिल्पा पवार, सदस्य नितीन दुर्गवळी, संतोष चौगुले, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास राणे, परिसरातील महसूल गावांचे पोलीस पाटील, विविध ग्रामसमित्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





