विसर्जन मिरवणुकीत जाकडी नृत्याची रंगत
दाभोळे ( सिकंदर फरास): गेले दहा दिवस अखंड भक्तिभाव आणि मंगलमय वातावरणात विराजमान असलेल्या लाडक्या गणरायाला आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर दाभोळे परिसरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी जयघोषाने अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. बाजारपेठ, बेलकरवाडी आणि धनगरवाडीसह पंचक्रोशीतील गणेशमूर्तींचे विसर्जन पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
दहा दिवस मनोभावे केलेल्या सेवेनंतर बाप्पाला निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले होते. विसर्जन मिरवणुकीत बेलकरवाडी येथील बालचमूंनी सादर केलेले पारंपरिक जाकडी नृत्य विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरत अबालवृद्धांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. ठिकठिकाणी झालेल्या महाआरती आणि टाळ-मृदंगाच्या आवाजाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते.
स्थानिक ग्रामस्थ, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि तरुण वर्गाच्या सक्रिय सहकार्यामुळे संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शांततेत, उत्साहात आणि पुढील वर्षाच्या आगमनाची आतुरता मनात साठवून भाविकांनी आपल्या विघ्नहर्त्याला निरोप दिला.





