रत्नागिरी: शहरासह उपनगरांत कर्णकर्कश आवाजाचे फटाका सायलेंसर बसवून शांततेचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर तसेच अशा उपकरणांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचा बडगा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उगारला आहे. अशा वाहनांची कसून तपासणी करून दुचाकी थेट जप्त करण्याचे आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक शाखेला दिले आहेत. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असतानाही त्यांनी फटाका सायलेंसर लावलेल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणावर धाडसी मोहिमा राबवल्या होत्या, त्याच धर्तीवर आता रत्नागिरी जिल्ह्यातही ही धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रत्नागिरी शहर आणि लगतच्या परिसरात दिवसाढवळ्या तसेच मध्यरात्रीच्या सुमारास फटाका सायलेंसर लावलेल्या दुचाकी भरधाव वेगाने पळवल्या जात असल्याने स्थानिक नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकतो आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरून सुसाट जाणाऱ्या अशा वाहनांची संख्या लक्षणीय वाढली असून, महाविद्यालयीन तरुणांसह अगदी अल्पवयीन मुलांच्या हाती अशा गाड्या दिसत आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रचंड आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान बालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोलिसांच्या गस्तीची व जेवणाची वेळ साधून, प्रामुख्याने दुपारच्या वेळी व रात्री साळवी स्टॉप ते मारुती मंदिर या मार्गावर अशा उपद्रवी दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ राहत असल्याचे समोर आले होते. या समस्येविरोधात त्रस्त ज्येष्ठ नागरिक पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याच्या तयारीत होते.
या गंभीर समस्येची दखल बुधवारी पोलीस अधीक्षकांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत घेण्यात आली. वाढत्या त्रासाची त्वरित दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शहरात विशेष तपासणी मोहीम राबवून अशा बेकायदा सायलेंसरच्या दुचाकी आढळल्यास त्या जागेवरच जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नव्हे तर, केवळ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून न थांबता अशा प्रकारचे फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या आणि ते दुचाकींना बसवून देणाऱ्या विक्रेत्यांवरही थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने हे व्यावसायिक आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कडक भूमिकेनंतर वाहतूक शाखा या मोहिमेची अंमलबजावणी प्रत्यक्ष रस्त्यावर कशा प्रकारे करते याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.




