१५ टक्के थकीत मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचा अंजनवेलवासीयांचा सरकारला इशारा
आबलोली: दाभोळ पॉवर प्रोजेक्टसाठी संपादित करण्यात आलेल्या एकूण ६१० हेक्टर जमिनीपैकी वापराविना पडून राहिलेली २०० हेक्टर जमीन तत्काळ मूळ शेतकऱ्यांना परत करण्यात यावी आणि १९९४ मधील संपादनाचा उर्वरित १५ टक्के फरक व्याजासह अदा करावा, अशी आग्रही मागणी अंजनवेलमधील प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडे लावून धरली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास सरकारविरोधात तीव्र लढा उभारून पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावू, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा अंजनवेल (बोरभाटले-कातळवाडी) ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस यशवंत सोनू बाईत यांनी दिला आहे. गुहागर तालुक्यातील कातळवाडी-बोरभाटले येथील सहाण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना यशवंत बाईत यांनी स्पष्ट केले की, १९९४ मध्ये शासनाने भूसंपादन करताना शेतकऱ्यांना केवळ ८५ टक्केच मोबदला दिला होता. उर्वरित १५ टक्के फरकाची रक्कम व्याजासहित मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींपैकी तब्बल दोनशे हेक्टर क्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून पडून असून, त्याचा कोणताही वापर झालेला नाही; त्यामुळे ही पडीक जमीन भूमिपुत्रांना परत मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या भावनांची वेळीच दखल न घेतल्यास अंजनवेलसह परिसरातील शेतकरी अधिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला यशवंत बाईत यांच्यासह विठ्ठल भालेकर, चंद्रशेखर बाईत, सुरेश देवाळे, गंगाराम भुवड तसेच अंजनवेल-कातळवाडी, वेलदूर-घरटवाडी आणि रानवी येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






