दापोली: दोन्ही किडन्या निकामी झाल्याने गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीचा दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. निकीता नामदेव राठोड असे मृत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळची सालोटगी (ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) येथील रहिवासी असलेली निकीता नामदेव राठोड (वय २२ वर्षे) सध्या दापोलीतील काळकाई कोंड परिसरात वास्तव्यास होती. गेल्या काही काळापासून तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ती गंभीर आजारी होती. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास तिला अचानक तीव्र दम लागण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे पुढील डायलिसिस उपचार आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी नातेवाइकांनी तिला सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच खालावली आणि डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ६९/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत आहेत. ऐन विशीतच एका तरुणीचा असा आजारपणाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





