गणपतीपुळे : कोकणातील लाडक्या गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा पवित्र योग जुळून आला आहे. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी अलोट गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त आढावा बैठक रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी देवस्थान समितीच्या कार्यालयात पार पडली. यात्रोत्सव सुरळीत, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून चोख नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी स्वयंभू गणपती मंदिराचे दरवाजे पहाटे ३.३० वाजता भाविकांसाठी खुले केले जाणार आहेत. मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते स्वयंभू श्रींची विधिवत पूजाअर्चा, मंत्रपुष्प आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल. भाविकांना सुलभ दर्शन घडावे यासाठी देवस्थान समितीकडून बॅरिकेड्स लावून स्वतंत्र दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची सोय आणि इतर मूलभूत सुविधांची चोख व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान आणि पोलीस यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
या उत्सवासाठी घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कराड, मिरज आणि कवठेमहांकाळ आदी भागांतून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, आपत्कालीन आरोग्य यंत्रणा, मंदिर परिसर आणि समुद्र चौपाटीवरील सुरक्षा यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि होमगार्ड तैनात राहतील, तर संपूर्ण परिसरावर जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या नियोजन बैठकीस संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच नीलेश कोल्हटकर, सचिव विनायक राऊत, पंच डॉ. श्रीराम केळकर, अमित मेहेंदळे, जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह महसूल, महावितरण, आरोग्य, वाहतूक विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, स्थानिक हॉटेल व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




