हृदयरोगाचे वेळेत निदान आणि निरोगी जीवनशैली काळाची गरज : डॉ. मोरे
संगमेश्वर : बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे हृदयविकाराचा धोका वाढत असताना, वेळेवर तपासणी आणि निरोगी सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोरे यांनी केले. संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम तसेच ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक मोफत आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी ते बोलत होते. हे शिबिर डॉ. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
शिबिरादरम्यान उपस्थित रुग्ण व नागरिकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराचे सेवन, नियमित व्यायाम आणि व्यसनांपासून मुक्ती याविषयी वैद्यकीय तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुरुवातीच्या सुवर्ण क्षणांमध्ये (गोल्डन अवर) तातडीने उपचार मिळवून जीव वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणाऱ्या शासनाच्या ‘स्टेमी’ (STEMI) उपक्रमाविषयी या वेळी जनजागृती करण्यात आली. छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवल्यास घरगुती उपचारात वेळ न घालवता त्वरित रुग्णालयात पोहोचण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत घेतलेल्या या विशेष शिबिरामध्ये उपस्थितांची एक्स-रे (X-Ray), हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजी (ECG) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधोपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत चांगला प्रतिसाद नोंदवला.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी असंसर्गजन्य रोग (एनसीडी) विभागाचे समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. वेळेवर वैद्यकीय तपासणी आणि सजगता हीच निरोगी हृदयाची खरी गुरुकिल्ली असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.






