राजापूर: राजापूर रॉयल चेस ऍकॅडमीने आयोजित केलेल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ११४ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. राजापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात ही स्पर्धा झाली.
स्पर्धेचे संचालक म्हणून मोहनसिन सय्यद यांनी, तर मुख्य पंच म्हणून प्राची मयेकर-सुर्वे यांनी काम पाहिले.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी तांबडे, कातकर, प्रशांत मराठे, अडेलकर, दिलीप चव्हाण, दीपक चव्हाण, अमोल बोटले, सदाशिव सरखोत आणि दिनेश कुडाळी उपस्थित होते.
मुख्य गटात सौरीश कशेळकर (रत्नागिरी) याने प्रथम क्रमांक मिळविला. सोहम रुमडे (रत्नागिरी) द्वितीय, तर आयुष अमेय रायकर (रत्नागिरी) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. श्रीहास नीलेश नारकर (चिपळूण), तनिष्का आडेलकर (कणकवली), तनिष तेंडोलकर (कणकवली), शुभम बावधनकर (राजापूर), गुरुप्रसाद साळवी (राजापूर), कौस्तुभ हर्डीकर (रत्नागिरी) आणि राजेंद्र साळवी (राजापूर) यांनीही अनुक्रमे उल्लेखनीय कामगिरी केली.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात कार्तिकेय चव्हाण (कणकवली), यश पवार (कणकवली) आणि वसंत संदीप गावस (सावंतवाडी) यांनी अनुक्रमे यश मिळविले. मुलींच्या गटात गार्गी अविनाश सावंत (कणकवली), तर कृष्णाली दत्तात्रय शिंदे (राजापूर) यांनी यश मिळविले.
१२ वर्षांखालील मुलांच्या गटात नील दिनेश कुडाळी (राजापूर), युवराज मंदार पेणकर (राजापूर), सोहम कौरवार (संगमेश्वर) याने पहिले तीन क्रमांक मिळविले. मुलींच्या गटात अनन्या पारकर (कणकवली) आणि गाथा दीपक चव्हाण (राजापूर) यांनी पहिले दोन क्रमांक मिळविले.
९ वर्षांखालील मुलांच्या गटात अन्वय जगदीश सापळे (वेंगुर्ले), अमेय लाटे (रत्नागिरी) आणि स्वानंद आमडोस्कर (कणकवली), तर मुलींच्या गटात कृष्णाई सागर खडपे (राजापूर), मारिया डियागो डिसोझा (सावंतवाडी) यांनी गुणानुक्रमे यश मिळविले.
स्पर्धेत बेस्ट सिनियर प्लेअरचा मान संजय कामतेकर (कणकवली) यांना, तर सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार अस्मिता विजय खानविलकर (रत्नागिरी) हिला मिळाला. सर्वोत्तम राजापूरमधील खेळाडू म्हणून सुजित जाधव, अजिम मुनीर मुल्ला आणि सोहम बावधनकर यांचा गौरव करण्यात आला.
सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभासाठी राजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जमीर खलिफे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश नाचरे यांनी केले. स्पर्धेसाठी आवश्यक क्रीडा साहित्य रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी आणि चैतन्य भिडे यांनी उपलब्ध करून दिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, पंच, स्वयंसेवक, पालक आणि सहभागी खेळाडूंचे विशेष सहकार्य लाभले.
राजापूर रॉयल चेस ऍकॅडमीच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला प्रतिसाद
Leave a Comment






