राजापूर (तुषार पाचलकर): पाचल गावचे उपसरपंच,शिवसेना पाचल व ओणी विभागप्रमुख तसेच नामवंत बांधकाम व्यावसायिक आत्माराम सुतार यांचा ५३ वा वाढदिवस शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी पाचल येथील निखिल लॉजिंगमधील निखिल सभागृहात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या अभीष्टचिंतन सोहळ्याला पाचल, ओणी तसेच राजापूर परिसरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून सुतार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
आपल्या वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना आत्माराम सुतार भावूक झाले होते. जनतेच्या अविरत आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच मी आजवरचा राजकीय व सामाजिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, भविष्यातही असाच स्नेह आणि आशीर्वाद पाठीशी राहिला तर जनसेवा अधिक प्रभावीपणे करत राहीन. आयुष्यात कधीही केवळ स्वार्थाचे राजकारण केले नाही; तर राजकारणात सक्रिय असताना नकळतपणे सातत्याने समाजकारण घडत गेले. याच निस्वार्थ सेवेमुळे आज सर्वसामान्य जनता मला आपल्या कुटुंबातील सदस्य मानते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कौटुंबिक व सामाजिक सोहळ्याला आत्माराम सुतार यांच्या पत्नी तथा माजी उपसभापती अमिता सुतार, सुपुत्र सोनू सुतार, सून, बंधू विश्राम सुतार यांच्यासह संपूर्ण सुतार परिवार उपस्थित होता. तसेच राजापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य अपेक्षा मासये, शिवसेना तालुकाप्रमुख नागले, विभागप्रमुख शैलेश साळवी, विभागप्रमुख अमर जाधव, आडीवली उपविभागप्रमुख प्रल्हाद नारकर, युवासेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, पाचल महिला विभागप्रमुख श्वेता पवार, ज्येष्ठ समाजसेवक आप्पा साळवी, श्रद्धा जाधव, हर्षद तेलंग, विहंग खानविलकर, अजय खानविलकर, परुळे उपसरपंच बाबू सावंत, अंबाजी गुरव, जयू नारकर, सुधीन तेलंग, अशोक वरेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे नेटके आणि ओघवते सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्वतः आत्माराम सुतार यांनी मानले.





