रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबाजवळील निवळी-बावनदी उतारावर आज दुपारी एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. धावत्या दुचाकीवरील ताबा सुटून गाडी घसरल्याने झालेल्या या अपघातात संगमेश्वर येथील एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील वांगणी येथील रहिवासी धनंजय गोविंद रांबाडे (वय ५२) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०८ एएच ५०१०) रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात होते. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची दुचाकी निवळी-बावनदीच्या तीव्र उतारावर आली असता, अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी जोरदार घसरली. या अपघातात धनंजय रांबाडे हे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. महामार्गावर अचानक झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूकही मंदावली होती.
घटनेची माहिती मिळताच हातखंबा येथे चोवीस तास तैनात असलेली जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका आणि मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदत पथकाने जखमी धनंजय रांबाडे यांना जागेवरच आवश्यक प्रथमोपचार केले आणि विलंब न लावता त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. वेळेत मिळालेल्या या वैद्यकीय सुविधेमुळे जखमीवर तात्काळ उपचार सुरू झाले असून, संकटसमयी धावून आलेल्या संस्थानच्या तत्पर सेवेचे महामार्गावरील प्रवाशांकडून कौतुक केले जात आहे.






