संगमेश्वर (धनाजी भांगे):- प्रतिकूल परिस्थिती आणि भौगोलिक आव्हानांवर जिद्द व कष्टाच्या जोरावर मात करत अत्यंत दुर्गम नायरी भागातील प्रचित गड माध्यमिक विद्यालय, कारभाटले येथील दहावीची विद्यार्थिनी कुमारी दिपाली सखाराम बावदाने हिने तालुका क्रीडा स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. १७ वर्षे वयोगट मुलींच्या उंच उडी (High Jump) प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून तिने ऐतिहासिक ‘हॅट्रिक’ आपल्या नावावर नोंदवली आहे. या सुवर्ण कामगिरीसोबतच मैदानी प्रकारातील चुरशीच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही तिने तिसरा क्रमांक मिळवून आपल्या अष्टपैलू क्रीडाकौशल्याचा ठसा उमटवला.
दहावीच्या बोर्ड परीक्षेचा ताण आणि ग्रामीण भागातील मर्यादा असतानाही खेळातील सातत्य टिकवून ठेवत दिपालीने मिळवलेले हे यशोशिखर संपूर्ण परिसरासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. या घवघवीत यशाच्या जोरावर तिची थेट जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.






