खेड: मुंबई-गोवा महामार्गावर नातू नगर मोहल्ला परिसरात दुपारी एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर पलटी होऊन मोठा अपघात घडला. या अपघातात कंटेनरमधील चालक दीपक मुरलीधर पाल (वय २८, रा. न्हावाशिव, मुंबई) हे जखमी झाले आहेत.
शनिवारी दुपारी साधारण १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्रमांक MH 46 CE 2228) नातू नगर मोहल्ला येथे पोहोचला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे हा अपघात घडून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही मार्गिका बंद झाल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका येथील पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्रचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. संस्थानाच्या वतीने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी २४ तास ही रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, जखमी चालकाची प्रकृती, वाहतूक सुरळीत होण्याची वेळ आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.




