गुहागर: गुहागर पोलीस ठाण्याची धुरा नुकतीच हाती घेतलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुका पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांची सुरक्षितता आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्या यांसारख्या विविध विषयांवर पोलीस प्रशासनासोबत मनसेच्या शिष्टमंडळाने सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.
तालुक्यामध्ये सर्वत्र शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण राहावे, सर्वसामान्य नागरिकांना निर्भयपणे जगता यावे आणि कायदा हातात घेणाऱ्या समाजकंटकांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आग्रही भूमिका मनसेच्या वतीने मांडण्यात आली. जनतेच्या तक्रारींची पोलीस ठाण्यात तातडीने दखल घेऊन सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळावा, यावर बैठकीत भर देण्यात आला. नागरिकांच्या हितासाठी मनसे सदैव आवाज उठवत राहील आणि त्याच वेळी कायदा व शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची मनसेची भूमिका कायम असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांच्या कार्यकाळात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य लाभेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सदिच्छा भेटीप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका सचिव प्रशांत साटले, मनविसे गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, सांस्कृतिक अध्यक्ष राहुल जाधव, मळण शाखाध्यक्ष मंगेश धामणस्कर तसेच महाराष्ट्र सैनिक महेश शिगवण यांच्यासह पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





