शौकत माखजनकर यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील वंचित व गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा
सावर्डे/ विनायक सावंत: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेसह विविध कल्याणकारी योजनांसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड अधिकृतपणे ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, चिपळूण तालुका संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष तथा सावर्डे गटाचे पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांनाही मोठे फळ मिळाले आहे. शासनाच्या या दिलासादायक निर्णयामुळे राज्यातील हजारो पात्र, वृद्ध आणि गरजू लाभार्थ्यांची कागदपत्रांची होणारी मोठी अडचण कायमस्वरूपी दूर झाली आहे.
सामाजिक व विशेष सहाय्य विभागाने पूर्वी लागू केलेल्या सुधारित तरतुदींनुसार संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला किंवा जन्मनोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांकडे हे दाखले उपलब्ध नसल्यामुळे केवळ कागदपत्रांअभावी पात्र व्यक्ती या शासकीय अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ही गंभीर अडचण लक्षात येताच शौकत माखजनकर यांनी हा विषय आमदार शेखर निकम यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर आमदार निकम यांनी तत्परतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली आणि वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्याची आग्रही मागणी करत निवेदन सादर केले होते.
या पाठपुराव्याची सकारात्मक दखल घेत जन्मदाखला व शाळा सोडल्याच्या दाखल्याची सक्तीची अट शिथिल करून आधार कार्ड ग्राह्य धरण्याबाबत निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वंचित घटकांना अर्ज करणे अत्यंत सुलभ होणार असून निवृत्तिवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गरजू लाभार्थ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरल्याचे सांगत, चिपळूण तालुका संजय गांधी योजना समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार शेखर निकम यांचे आभार मानून अभिनंदन करण्यात आले आहे.





