चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे परिसरातील खेरशेत येथे उभ्या असलेल्या एका कंटेनरचे सील व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ६४ हजार २०६ रुपये किमतीचा औषधांचा साठा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बरहाज तालुक्यातील कपरवार येथील रहिवासी असलेले २६ वर्षीय चालक अनीस कदूस अहमद हे कंटेनर (क्रमांक जीजे १५ एएक्स ४८३६) घेऊन जात होते. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच ते पाच या वेळेत त्यांनी सावर्डे हद्दीतील खेरशेत येथील हॉटेल स्वामी व हॉटेल पंचामृत परिसरात जेवणासाठी आणि विश्रांतीसाठी कंटेनर उभा केला होता. चालक जेवण करून विश्रांती घेत असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कंटेनरच्या मागील दरवाजाचे अधिकृत सील व कुलूप तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी औषधांचे बॉक्स लंपास केले.
या चोरीत १ लाख ६ हजार ९९७ रुपये ६० पैसे किमतीचे ‘डायजीन टॅब मिंट’ औषधाचे ६ बॉक्स (बॅच नंबर ९३२००७डी७) तसेच ५७ हजार २०९ रुपये १४ पैसे किमतीचे ‘ब्रुफेन ४०० एमजी’ औषधाचे ६ बॉक्स (बॅच नंबर ९३२८०७डी७) असा एकूण १ लाख ६४ हजार २०६ रुपये ७४ पैसे किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेनंतर चालकाने १६ ऑक्टोबर रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात हजर राहून रीतसर तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून सावर्डे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंद क्रमांक १३२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






