रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेले शहरातील नामांकित कापड व्यावसायिक सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ हे पश्चिम बंगालमधील कोलकात्यात सुखरूप सापडले असून, त्यांच्या सुरक्षिततेची खात्री पटल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण व्यापारी वर्गाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ओसवाल यांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे रत्नागिरीच्या व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती आणि विविध चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, त्यांनी कोलकात्यातील एका एटीएम केंद्रातून रोकड काढताच तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने त्यांचे अचूक लोकेशन तपास यंत्रणेच्या हाती लागले. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या सहकार्याने शोध घेतला असता ते सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ठावठिकाण्याबाबत स्पष्टता आल्याने गेले काही दिवस चिंतेच्या छायेत असलेल्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला असला, तरी ते अचानक थेट कोलकात्याला नेमके कोणत्या कारणासाठी गेले, याचे गूढ अद्याप कायम असून लवकरच त्यामागील खरी कारणे समोर येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.




