गुहागर: गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल आणि कोंकण एल.एन.जी. लिमिटेड या संवेदनशील विद्युत व गॅस प्रकल्पांमध्ये विविध कंत्राटदारांमार्फत मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या सर्व कामगारांची स्थानिक ग्रामपंचायत आणि संबंधित पोलीस ठाण्यात अधिकृत नोंदणी व ओळख पडताळणी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष न दिल्यास मनसेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
औद्योगिक विकास होत असताना स्थानिक परिसरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची सुरक्षितता टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करत जानवळकर यांनी नमूद केले की, परराज्यातून रोजगारासाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराकडे संशयाने पाहणे योग्य नसले, तरी संभाव्य गैरप्रकार आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अधिकृत माहिती संकलित करणे अनिवार्य आहे. यासाठी कामगार पुरवणाऱ्या प्रत्येक ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करून कामगाराचे पूर्ण नाव, मूळ गाव, कायमचा पत्ता, ओळखपत्राचे तपशील, सध्याचे वास्तव्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक असलेली अद्ययावत यादी प्रशासनाकडे सादर करण्याचे बंधन घालावे. तसेच कामगार रुजू होताना आणि काम सोडताना नोंद अद्ययावत ठेवणे, कंपनी प्रवेशद्वारावर काटेकोर सुरक्षा तपासणी करणे गरजेचे आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास जलद तपासासाठी या नोंदी उपयुक्त ठरणार असल्याने स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापनाने समन्वयातून संयुक्त कार्यपद्धती निश्चित करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.






