चिपळूण/ निलेश कोकमकर: राज्यात पावसाच्या लहरीपणामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन बंधारे अभियान २०२६-२७’ अंतर्गत कळंबट येथील गडग्याच्या पऱ्यावर श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत राबवलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि उन्हाळ्यात परिसरातील शेती व विहिरींना पाण्याचा आधार मिळावा, या हेतूने हे बंधारे उभारण्यात आले आहेत. कुणबी शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कळंबट येथील शिक्षक व विद्यार्थी, ग्रुप ग्रामपंचायत कळंबट-केरे-घवाळेगावचे सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून हे काम अल्पावधीत पूर्ण केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणून कळंबटकरांनी आदर्श घालून दिला आहे.
या श्रमदान मोहिमेत कळंबट हायस्कूलचे शिक्षक महेंद्र शिरकर, सतीश जाधव, संतोष बळकटे, रवींद्र कोकमकर, सौ. साळुंके, प्रशांत पोवार, सीताराम बारगोडे, भुवड सर, कल्पेश कोकमकर यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच ग्रामस्थ बबन गमरे, सुधाकर केळकर, शरद शिरकर, अंगणवाडी सेविका मंजू कोकमकर, छाया घवाळे, अलका लिंगायत आणि आरोग्य सेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शासकीय मोहिमेला लोकसहभागाची भक्कम जोड मिळाल्यास जलसंधारणाची कामे कशी यशस्वी होतात, याचे उत्तम उदाहरण कळंबट गावाने दाखवून दिले आहे.







