गणपतीपुळे (वैभव पवार): रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात रविवारी कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिभावात प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा अशा महिनाभराच्या कालावधीत हा दीपोत्सव अखंडपणे चालणार असून, मंदिराचा संपूर्ण परिसर दिव्यांच्या तेजाने उजळून निघाला आहे.
दीपोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, पुरोहित वर्ग, ब्रह्मवृंद, देवस्थानचे कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या चरणी दीपप्रज्वलन करून सेवा अर्पण करण्यात आली. या कालावधीत दररोज सायंकाळच्या आरतीच्या वेळी मंदिरातील विजेचे सर्व दिवे बंद केले जातात आणि केवळ पारंपरिक पणत्या प्रज्वलित केल्या जातात. शेकडो पणत्यांच्या मंद आणि लख्ख उजेडात न्हाऊन निघणारे मंदिराचे गर्भगृह आणि परिसर भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.
या दीपोत्सवात स्वतःच्या हाताने पणती लावून सेवा रुजू करण्याची संधी प्रत्येक भाविकाला मिळत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होत आहे. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरस आणि मांगल्याच्या प्रकाशात न्हाऊन निघणारा हा देखणा सोहळा आगामी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार असून, या महिनाभरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या दीपोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.





