राजापूर ( तुषार पाचलकर): गगनगिरी गडावर कोगजागिरी निमित्त आयोजित सोहळ्यात राजापूर तालुक्यातील रायपाटण गावच्या श्वेता इस्कार या तरुणीने सलग १८ तास अविरत कष्ट घेत ६ फूट उभी आणि ५ फूट आडवी अशी भव्य रांगोळी साकारून आपली आगळीवेगळी कला जपली आहे. तिच्या या कलेचे आणि अखंड निष्ठेचे गडावरील भाविक तसेच सेवेकऱ्यांकडून मोठे कौतुक होत असून, तिने सर्वांचीच वाहवा मिळवली आहे.
गगनगिरी गडावर गजागिरीनिमित्त रांगोळीचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळीचा आकार अत्यंत मोठा असल्याने २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच श्वेताने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. ही भली मोठी रांगोळी साकारताना सोबतीला कोणीही नसल्यामुळे सुरुवातीला काहीसे नैराश्य आले होते. त्यातच रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशावर येणारे किडे रांगोळीत पडत असल्याने रेखाटलेली रांगोळी वारंवार खराब होत होती. हा मोठा अडथळा ठरत असतानाही रांगोळी अधिक सुबक आणि आकर्षक व्हावी यासाठी श्वेताने जिद्दीने पुन्हा पुन्हा रेखाटनाचे प्रयत्न सुरू ठेवले. या खडतर परिश्रमात तब्बल १८ तासांचा कालावधी कधी उलटून गेला हे समजलेच नाही. अखेर २५ ऑक्टोबर रोजी पहाटेची काकड आरती संपत आली असताना सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी ही भव्य रांगोळी पूर्णत्वास गेली.
श्वेताने घेतलेली ही अखंड मेहनत आणि सलग १८ तास दिलेली सेवा पाहून उपस्थित सेवेकऱ्यांनाही ही साधना आहे की सेवा असा प्रश्न पडला होता. तिच्या या अलौकिक कलाकृतीकडे पाहून भाविकांना साक्षात भगवंताची कृपा असल्याची प्रचिती आली आणि श्वेता सर्वांसाठीच कौतुकाचा विषय ठरली. या भक्तीमय सेवेची पावती म्हणून गडावरील सेवेकऱ्यांनी श्वेताला पैठणी व नारळ-श्रीफळ देऊन सन्मानित केले. तसेच गगनगिरी महाराजांचे वंशज संजय दादा सरकार यांनीही श्वेताचे विशेष कौतुक करत तिला साडी व श्रीफळ देऊन गौरवले.







