तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि मानवी संवेदनशीलतेचा संगम
मुंबई: म्हाडा ही देशातील गृहनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची संस्था आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या अभियांत्रिकी संस्थेतील अभियंत्यांचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व अधिक महत्त्वाचे ठरते. “भविष्यातील अभियंता केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणणारा नसावा; तर तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी करणारा संवेदनशील अभियंता असावा,” असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी आज केले.
वांद्रे येथील सभागृहात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिन – २०२६ या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. जयस्वाल यांनी अभियंत्यांना संबोधित केले. ते म्हणाले, “म्हाडा ही केवळ घरे बांधणारी संस्था नसून लाखो कुटुंबांची स्वप्ने साकार करणारी आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा पाया घालणारी देशातील अग्रगण्य गृहनिर्माण संस्था आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये, संवेदनशीलता आणि गुणवत्तेची जपणूक हीच आपल्या कार्याची खरी ओळख असली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली तरी मानवी विचारशक्ती, भावना आणि संवेदनशीलतेची जागा ती घेऊ शकणार नाही. कारण तंत्रज्ञान माहितीचे विश्लेषण करू शकते आणि निर्णय प्रक्रियेला गती देऊ शकते; मात्र माणूस विचार करण्यासोबतच अनुभवतो, संवेदना जाणतो आणि सहानुभूतीने निर्णय घेतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये जपणे हीच भविष्यातील खरी गरज आहे.”
भविष्यातील गृहनिर्माण विकासात अभियंत्यांची भूमिका निर्णायक राहणार असून, पुढील सात ते आठ वर्षे म्हाडासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक असणार आहेत, असेही श्री. जयस्वाल यांनी नमूद केले. बदलत्या काळानुसार कार्यपद्धतीत आवश्यक बदल स्वीकारत आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण विचार आणि मानवी संवेदनशीलता यांचा समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी अभियंता वर्गाला केले.
याप्रसंगी म्हाडाचे मुख्य अभियंता श्री. महेश जेसवानी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यातून अभियंता वर्गाने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
मुख्य अभियंता श्री. अनिल अंकलगी यांनी गुणवत्तापूर्ण काम, वेग आणि अचूकता ही अभियंत्यांच्या कार्यपद्धतीची मूलतत्त्वे असल्याचे सांगितले. सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास संस्थेची कार्यक्षमता अधिक वाढू शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले.
मुख्य अभियंता-१ श्री. धीरजकुमार पंदिरकर यांनी म्हाडाच्या बांधकाम पद्धतीमध्ये काळानुरूप मोठे बदल झाले असल्याचे नमूद केले. आज पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आधुनिक प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञान गृहनिर्माण क्षेत्रातही वापरल्यास बांधकामाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊन लाभार्थ्यांना अधिक मूल्यवर्धित घरे उपलब्ध होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.
अभियंता दिनाच्या कार्यक्रमात पदोन्नती झालेल्या अभियंत्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री. राकेश गावित यांनी केले.
महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार – संजीव जयस्वाल
Leave a Comment





