रत्नागिरी : आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांचे भविष्य घडविणाऱ्या निवृत्त शिक्षिका मीनाक्षी पद्माकर तुपे यांनी मृत्यूनंतरही समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. हनुमान सोसायटी, उत्कर्ष नगर येथील रहिवासी असलेल्या मीनाक्षी तुपे (वय ७८) यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करून वैद्यकीय शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडलेले हे २६ वे देहदान ठरले.
मीनाक्षी तुपे यांचे बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. हयात असतानाच त्यांनी आपला देह भावी डॉक्टरांच्या शिक्षणासाठी आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयोगात यावा, या उदात्त हेतूने देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा आदर करत देहदानासोबतच नेत्रदानाचाही निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीमुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी मदत होणार असून, नेत्रदानातून गरजू व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होण्याची आशा आहे.
शिक्षिका म्हणून आपल्या आयुष्यात अनेक विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या मीनाक्षी तुपे यांनी मृत्यूनंतरही ज्ञानदानाची परंपरा कायम ठेवली. स्वतःच्या देहाचा उपयोग इतरांच्या शिक्षणासाठी व्हावा, ही त्यांची भावना समाजाप्रती असलेली निःस्वार्थ बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. त्यांच्या या निर्णयातून देहदान आणि नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, समाजातील इतरांनाही अशा मानवतावादी कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा पंकज तुपे, सून वृषाली, मुलगी प्रणिता मुकादम, जावई संजय मुकादम, नातवंडे आणि सुना असा परिवार आहे. दुःखाच्या प्रसंगातही कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेला प्राधान्य देत सामाजिक जाणीव जपली. तुपे कुटुंबीयांच्या या निर्णयातून अवयवदान आणि देहदानाबाबतची संवेदनशीलता दिसून आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी शरीररचनाशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर आणि वाहनचालक सौरभ जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यासाठी समीर करमरकर यांचेही विशेष सहकार्य लाभले.
मीनाक्षी तुपे यांच्या मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाच्या निर्णयाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने तुपे कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर मृत्यूनंतरही वैद्यकीय शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या मीनाक्षी तुपे यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.





