रत्नागिरी (वैभव पवार): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१व्या जयंतीचे औचित्य साधून गुजरात येथील जगप्रसिद्ध ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ येथे भव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राच्या लावणी नृत्यकला पथकाचे नेतृत्व करण्याचा सर्वोच्च बहुमान कोकणातील मालगुंडची कन्या, युवा अभिनेत्री व नृत्यांगना रसिका राकेश पवार हिला मिळाला आहे. देशाच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्राची समृद्ध लोककला असलेल्या लावणीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी रसिकाला लाभल्याने संपूर्ण कोकणासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्तुळात तिचा मोठा अभिमान व्यक्त होत आहे.
मूळ मालगुंडची असलेली आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असणारी २५ वर्षीय रसिका ही बहुआयामी कलाकार असून लावणी हा तिचा अत्यंत आवडता नृत्यप्रकार आहे. तिने कथ्थकच्या चौथ्या वर्षाचे शास्त्रीय प्रशिक्षण पूर्ण करण्यासोबतच वांद्रे येथील थ्री स्टार अकादमीतून लोकनृत्य व पाश्चात्त्य नृत्याचे धडे गिरवले आहेत; तसेच शास्त्रीय, वेस्टर्न, समकालीन, टॉलीवूड, बॉलीवूड, वॅकिंग, हिप-हॉप आणि झुंबा अशा विविध नृत्यशैलींवर तिचे उत्तम प्रभुत्व आहे. सिडनहॅम महाविद्यालयाची एकल स्पर्धा, संस्कृती कला दर्पण आंतरशालेय स्पर्धा सलग तीन वर्षे, आंतरमहाविद्यालयीन आणि महाराष्ट्र उत्सव लोकनृत्य समूह स्पर्धा अशा अनेक राज्यस्तरीय मंचांवर तिने आपल्या नृत्याची छाप पाडत प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. नृत्यासोबतच जेडीआय डान्स क्लासेस, ३डी क्रू, ऑल-राउंडर अकादमी, सीवूड्स येथील एनएमएमसी सीबीएसई स्कूल तसेच स्वतंत्र नृत्य व झुंबा प्रशिक्षक म्हणून तिने गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे.
नृत्याइतकाच रसिकाचा अभिनय क्षेत्रातील प्रवासही लक्षवेधी राहिला असून तिने डॉ. विजया मेहता, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि स्मिता तळवलकर यांच्या अस्मिता चित्र अकादमीमधून अभिनयाचे कसदार प्रशिक्षण घेतले आहे. टेलिव्हिजन विश्वात तिने झी मराठीवरील ‘अस्मिता’ आणि स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘लक्ष्य’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या, तर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जांभूळ’ या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावरही स्वतःची ओळख निर्माण केली. रंगभूमीवर बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेपासून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
‘बंध नात्याचे’ या बालनाट्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार, ‘जेवणावळ’ एकांकिकेसाठी पद्मश्री डी. वाय. पाटील महाकरंडकात तृतीय क्रमांक, ‘अस्तित्व – एक संघर्ष’ आणि ‘पोरींचा बाप डोक्याला ताप’ या नाटकांतील तिच्या कामाचे विशेष कौतुक झाले आहे. याशिवाय जे. ए. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे, अटल करंडक आणि आम्ही वसईकर अशा नामांकित स्पर्धांमध्ये तिने अभिनयाची पारितोषिके जिंकली आहेत. सध्या रसिका ही ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित ‘घासीराम कोतवाल’ या हिंदी नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. अशा या अष्टपैलू आणि व्यासंगी युवा कलाकाराच्या खांद्यावर राष्ट्रीय एकता दिनाच्या मंचावर महाराष्ट्राच्या लावणी पथकाची धुरा सोपवण्यात आल्याने मालगुंडसह संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





