महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून २०२६-२७ चा सन्मान; तळवडे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तळवडे येथे कार्यरत असलेले शिक्षक संजय सिताराम बांडागळे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संगमेश्वर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि अध्यापनातील योगदानाची दखल घेत संजय बांडागळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे तळवडे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि शिक्षण अधिक प्रभावी व आनंददायी व्हावे, यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर संजय बांडागळे यांची झालेली निवड ही संगमेश्वर तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





