रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुवारबाव परिसरातील पाटबंधारे कार्यालय ते रेल्वेस्थानक फाटा या दरम्यान भव्य चारपदरी उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला प्रारंभ झाला आहे. सुमारे ९२५ मीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ९५ कोटी ९५ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची तरतूद करण्यात आली असून, संबंधित ठेकेदार कंपनीला जून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर रत्नागिरी शहरातून थेट हातखंब्याच्या दिशेने धावणारी वाहतूक गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे.
मिऱ्या ते नागपूर या चौपदरी महामार्गाच्या बांधकामाने सध्या चांगलाच वेग घेतला आहे. रत्नागिरी ते थेट आंबा घाट या मार्गावरील बहुतांश कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित किरकोळ कामे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कुवारबाव परिसरातील चौपदरीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. उड्डाणपुलाचे भविष्यातील स्वरूप लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या सध्याच्या रस्त्याचा उपयोग पूल कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांसाठी सर्व्हिस रोड म्हणून केला जाणार आहे.






