दाभोळे/सिकंदर फरास : यावर्षी पावसाअभावी अपुऱ्या पाण्यामुळे दाभोळे येथील पडियार वाडी आणि बेलकरवाडी आणि आजुबाजूच्या परिसरातील भातशेती करपली असून, शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. कृषी अधिकारी चौगुले यांनी स्वतः प्रत्येक वाडीवर व थेट शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत.
या परिसरातील पावसाच्या लहरीपणाचा फटका भात पिकांना बसला असून ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पाणी न मिळाल्यामुळे भातशेती सुकून गेली.यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, या उद्देशाने कृषी अधिकारी चौगुले यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून नुकसानीची पाहणी केली आणि पिकांचे पंचनामे पूर्ण केले. या पाहणीदरम्यान शेतकरी व ग्रामस्थ संतोष पडियार हे कृषी अधिकारी चौगुले यांच्यासोबत उपस्थित होते. लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी आर्त हाक या भागातील शेतकरी देत आहेत.
दाभोळे: कृषी विभागाकडून भातशेतीचे पंचनामे पूर्ण; पावसाअभावी शेतकरी संकटात
Leave a Comment






