रायगड: बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी व्हीबीजी रामजी योजनेतून अडीच एकर क्षेत्रासाठी सात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बांबू लागवड आणि त्यावर आधारित उद्योगातून आर्थिक समृद्धी साधावी, असे आवाहन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
मुरुड तालुक्यातील शिरगाव येथे ग्रीन केन बांबू वर्ल्ड असोसिएशनच्या सामाईक सुविधा केंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.
बांबू लागवडीसाठी चार वर्षांच्या देखभालीसह टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाणार आहे. बांबूपासून फर्निचर, सजावटीच्या वस्तू, ग्लास, पेन, टूथब्रश यांसारखी उत्पादने तयार करून मूल्यवर्धनाला चालना देता येईल. या उद्योगातून स्थानिक रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे गोगावले यांनी सांगितले. बांबू रोपांच्या उपलब्धतेसाठी टिश्यू कल्चर प्रयोगशाळेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांची मदत देण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगडमध्ये मागील वर्षी ३२ लाख बांबू रोपांची निर्मिती व वितरण केल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील ८११ ग्रामपंचायतींमध्ये बांबू लागवड करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर बांबू उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाईक सुविधा केंद्रासाठी सुमारे आठ कोटी दहा लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर असून, त्यामध्ये बांबू प्रक्रिया, कटिंग, बेंडिंग, एनग्रेव्हिंग आणि चारकोल निर्मितीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध होणार आहे. सध्या ८८ उद्योजक या क्लस्टरमध्ये सहभागी असून, सुमारे ३०० ते ४०० कारागिरांना त्याचा लाभ अपेक्षित आहे. पुढील सहा महिन्यांत केंद्र कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त जी. एस. हरळय्या यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, बांबू उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते.





