चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघातात अशोक कृष्णा राणे (वय ५६, रा. कोळकेवाडी जोशीवाडी, ता. चिपळूण) यांचा मृत्यू झाला असून संजय श्रीकांत पवार (वय ४०, रा. गणेशपूरवाडी, नांदिवसे, ता. चिपळूण) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दुचाकीस्वार संजय पवार हे त्यांच्या ताब्यातील एच.एफ. डिलक्स दुचाकी (क्रमांक MH 08 AV 9603) घेऊन जात असताना त्यांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले. यावेळी समोरून येणाऱ्या अशोक राणे यांच्या एच.एफ. डिलक्स दुचाकीला (क्रमांक MH 08 AZ 0996) त्यांनी जोरदार धडक दिली.
या धडकेत अशोक राणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार संजय पवार हेही जखमी झाले. या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. वाहन वेगावर नियंत्रण न ठेवता वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संकेत अशोक राणे (वय २७, व्यवसाय नोकरी, रा. कोळकेवाडी जोशीवाडी, ता. चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६, १२५, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.





