महिला सक्षमीकरणासह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा विस्तार; संचालिका वृषाली सावंत यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान
चिपळूण : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून कोकणात भरीव कार्य करणाऱ्या कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सौ. अपेक्षा सूर्यकांत हळदणकर, तर जिल्हा सचिवपदी सौ. श्रद्धा संजोग वाडकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालिका तथा प्रसिद्ध विधिज्ञ सौ. वृषाली सावंत यांनी या नियुक्त्या जाहीर करून दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना प्रसिद्ध विधिज्ञ सौ. वृषाली सावंत आणि कु. प्रेरणा सावंत यांनी केली आहे. कोकणातील दुर्गम भागातील गावागावांत सामाजिक कार्याचा वसा घेऊन ही संस्था कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालकल्याण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक न्याय आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येतात. विशेष म्हणजे कोणतेही शासकीय अथवा अन्य अनुदान न घेता संस्था स्वखर्चाने सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत आहे. अल्पावधीतच संस्थेने कोकणातील अनेक गावांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या सौ. अपेक्षा सूर्यकांत हळदणकर या मूळच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील रहिवासी असून त्यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव आहे. तर जिल्हा सचिवपदी नियुक्त झालेल्या सौ. श्रद्धा संजोग वाडकर या गुहागरमधील वेळंब रोड येथील रहिवासी आहेत. या दोन्ही नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी संस्थेच्या कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी बोलताना संस्थेच्या संचालिका सौ. वृषाली सावंत म्हणाल्या की, केवळ सामाजिक जाणीव आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. संपूर्ण कोकणात संस्थेचा विस्तार असून, विशेषतः महिलांना सक्षम बनविणे, त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणे आणि समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. आगामी काळात महिलांसाठी अधिक व्यापक आणि भरीव कार्य करण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक विभागाचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले, विनोद चिपळूणकर, मस्तकिन चांदशहा, भाई सुर्वे, मिलिंद कदम, वाजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.







