कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीचा आज प्रत्यक्ष फैसला होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज मंगळवारी संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत असून, अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या हाती जाणार यावरून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे. पंचवीस जागांच्या संचालक मंडळात समविचारी आघाडीकडे तेरा तर महायुतीकडे बारा असे संख्याबळ स्पष्ट झाले होते. मात्र पहिल्या बैठकीत अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेली किमान चौदा संचालकांची गणसंख्या पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी बैठक तहकूब केली होती. या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागितल्यानंतर न्यायालयाने आज, १० नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
दरम्यान, पाचशे कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संघांवर पाच संचालक नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार गोकुळवर शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मतदानाचा अधिकारही बहाल करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते; मात्र न्यायालयाने अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार देत निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. असे असले तरी, नियुक्त चार संचालकांच्या मतदानासाठी स्वतंत्र मतपेटी ठेवणे, मतदान प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करणे आणि जाहीर होणारा निकाल न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन ठेवणे, अशा कडक अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार असल्याने आज प्रत्यक्ष अध्यक्ष कोण होणार आणि न्यायालयीन लढाईत पुढे काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






