संस्कृती फाउंडेशनतर्फे भक्तिगीते, भावगीते आणि बहारदार नृत्यांचा कलाविष्कार
लांजा(अरबाज नेवरेकर): दीपावलीनिमित्त संस्कृती फाउंडेशन, लांजा-रत्नागिरी यांच्या वतीने ‘स्वरबहार’ या विशेष संगीतसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता लांजा ग्रामदैवत श्री देव चव्हाटा मंदिर येथे हा सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे.
या कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते तसेच बहारदार नृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार असून संगीतप्रेमींना दर्जेदार सांस्कृतिक मेजवानी अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
या संगीतसंध्येत गायक म्हणून राजेश गोसावी, अर्जुन कालकर, सुप्रिया कालकर, संगीता भिडे, गुरुदेव नांदगावकर, सुनील अभ्यंकर आणि दिशा अभ्यंकर सहभागी होणार आहेत. तर वाद्यवृंदामध्ये मृदुंगावर मंदार जाधव, कीबोर्डवर दिग्विजय डेरे, तबल्यावर कौस्तुभ सुतार, ध्वनी व्यवस्थापनासाठी मोरया साऊंड, ऑक्टोपॅडवर विशाल करंबेळे, हार्मोनियमवर अर्जुन कालकर आणि तालवाद्यावर सुनील अभ्यंकर साथ देणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन योगेश शेट्ये आणि कांचन लांजेकर करणार असून नृत्य नियोजनाची जबाबदारी प्रियवंदा जेधे आणि अभिषेक उपशेटे सांभाळणार आहेत.
संस्कृती फाउंडेशनचे सचिव विनोद बेनकर, उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, अध्यक्ष गौतम कांबळे आणि संस्थापक राजेश गोसावी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या संगीतसंध्येला लांजा परिसरातील नागरिक, संगीतप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.







